आरोग्य विभागाची धावाधाव; दर दिवशी सापडताहेत 20 हून अधिक रुग्ण
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
महानगराची ओळख निर्माण करू पाहणार्या पनवेलला डेंग्यूचा विळखा पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या महानगरातूून आता अलिबाग, पेणमधील या ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण अधिक सापडत आहेत. मागील अनेक दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्युला रोखण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले आहे. मात्र, हे संकट संपेना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या यंत्रणेची धावाधाव सुरु झाली आहे. ऐन गणेशोत्सवात डेंग्यू वाढल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन, कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल, अलिबागबरोबरच आता पेण तालुक्यातदेखील डेंग्यूचे रुग्ण सापडत आहे. हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे. तपासणीत डेंग्यू पॉझिटीव्ह कमी सापडत असले, तरी दर दिवशी 20हून अधिक डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहे.
जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कळंबोळी, खारघर, नवीन पनवेल, सुकापूर, विचुंबे तसेच पनवेल शहराबरोबरच पेणमधील रावे, अलिबागमधील भाल, साखर या भागात सोमवारी एका दिवसात 36 रुग्ण सापडले आहेत. तसेच मंगळवारी 20हून अधिक रुग्ण सापडल्याची माहिती समोर येत आहे. हे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह पेणमधील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा अनेक रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाचीदेखील धावाधाव सुरु झाली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण सापडत आहेत, त्या ठिकाणी यंत्रणेद्वारे तपासणी करून परिसरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. गावागावात जनजागृती केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. इतक्या उपाययोजना करूनदेखील शहराबरोबरच आता डेंग्यूने ग्रामीण भागातदेखील शिरकाव केला आहे.
शहरातील नागरिकांमुळे गावात डेंग्यू
रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल शहरात डेंग्यूचे रुग्ण अधिक सापडत आहे. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे गावाकडे येणार्यांची वर्दळ वाढली आहे. शहरी भागातील नागरिक गावी आले आहेत. डेंग्यू हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील तापाचे रुग्ण वाढले असल्याची माहिती हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
डेंग्यू रोखण्यासाठी हे उपाय
घरांच्या परिसरात अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. सखल भागात साचलेले पाणी काढून तो भाग कोरडा करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घरात डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा मोलाचा सल्ला वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे.