पावसामुळे फटका, बागायतदारांचा अंदाज
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पावसाळा लांबल्यामुळे त्याचा परिणाम आब्यांवर झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारीत येणारा आंबा यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस येणार असल्याचा अंदाज आंबा बागायतदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्यासाठी यंदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाशीतील एपीएमसी मार्केटमधील फळ मार्केट देशातील आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात फक्त कोकणच नाही, तर जगभरातून आंबे दाखल होतात. ही कोकणातील आंब्याच्या विक्रीची मोठी बाजारपेठ आहे, पण यंदा पावसाळा लांबल्यामुळे तसेच थंडीला उशिरा सुरुवात झाल्याने आठवडाभर कोकणासहीत ग्रामीण महाराष्ट्रात गारवा निर्माण झाला आहे. तापमानाचा पारा 18 अंशापर्यंत नोंदवला आहे.
कोकणात गरम हवा, लाल आणि खडकाळ माती आंब्यासाठी पोषक असते. कोकणात मोठ्या प्रमाणात आंबा प्रमुख फळ येते. आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे, परंतु अद्याप झाडाला मोहोर आलेला नाही. थंडी पडून आठवडा झाला आहे. साधारणतः 15 नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते, पण मार्च अखेरीस आंबा दाखल होईल, असा अंदाज आहे.
जमिनीत ओलावा
नोव्हेंबरमध्ये पाऊस शेवटपर्यंत राहिल्यामुळे जमिनीतील ओलावा संपलेला नाही. अखेरचा पाऊस जास्त झाल्यामुळे आंब्याच्या मोहोराला पोषक नसते. आंब्याची झाडे पोषक आहेत. मोहोर येण्यास थंडी आणि गरमी, असे दोन्ही वातावरण मर्यादित अवस्थेत आहेत. कापलेले गवत पुन्हा उगवत आहे. त्यामुळे एक महिना उशिराने आंबा येणार असल्याचा अंदाज आहे.
आंब्यासाठी पोषक असणारा इशान्यकडून वारा येतो, तो यंदा पावसामुळे उशिराने सुरू झाला आहे. एक महिना उशिराने पोषक वातावरण होणार असल्याने आंबा तयार होण्यास वेळ लागणार आहे.
-सचिन लांजेकर,
आंबा बागायतदार, रत्नागिरी.







