सीगल पक्ष्यांचे कोकणात आगमन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

दरवर्षी थंडीचा हंगाम सुरू झाला की, कोकणात समुद्रकिनार्‍यावर विविध प्रकारच्या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. या थंडीच्या हंगामात प्रथम पांढर्‍या शुभ्र रंगांच्या बगळ्यांचे आगमन होते. हे बगळे देखील अनेकवेळा आकर्षण ठरतात. आकाशात हे बगळे विहार करत असताना मनमोहक दिसतात. यानंतर बगळ्यांच्या पाठोपाठ सीगल पक्ष्यांचे थव्याने आगमन होते. सीगल पक्षी हे दरवर्षी रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि रायगड किनारपट्टीवर मोठ्या संख्येने आढळतात. यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच सिगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. कोकणातील विविध किनारे सीगल पक्ष्यांच्या आगमनांनी फुलले आहेत. दापोलीतील हर्णे, लाडघर, कर्दे, पाळदे, आडे, केळशी, गुहागर तालुक्यातील विविध समुद्रकिनारी शेकडोंच्या संख्येने सीगल पक्षी आल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी देखील ही एक पर्वणीच ठरत आहे.

दापोली तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर देखील हे सीगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी राजापूर किनारपट्टीवर देखील मुक्काम ठोकला आहे. लडाख प्रदेशामध्ये आढळणारा सीगल पक्षी हा येथील किनारपट्टीवर आला आहे. लालभडक चोच, पांढर्‍या शुभ्र पिसांनी वेढलेले शरीर अशा आकर्षक असलेल्या या सीगल पक्ष्यांच्या थव्यांनी तालुक्याची किनारपट्टी फुलून गेली आहे. थंडीच्या कालावधीमध्ये लडाखमध्ये पडणार्‍या बर्फामुळे या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. त्यामुळे खाद्य आणि वास्तव्याला अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात. या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोग्या असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनार्‍यावर वळू लागली आहेत. थंडीच्या हंगामात खास सीगल पक्षी पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या देखील मोठी असते

Exit mobile version