“स्वराज्य भूमी कोकण यात्रे”चे अलिबागमध्ये आगमन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

समृद्ध कोकण प्रदेश संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “स्वराज्य भूमी कोकण यात्रे”चे शुक्रवारी दि. 12 अलिबाग येथे आगमन झाले. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी यात्रेचे स्वागत केले. कान्होजी आंग्रे यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्लोबल कोकण, समृद्ध कोकण प्रदेश संघटनेचे सस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, रघुजीराजे आंग्रे, विजय राणे, धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

समृद्ध कोकण प्रदेश संघटनेने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोकणातील ऐतिहासिक सर्व प्रमुख गावांना भेट आणि जनजागृती सभा देशाचे नेतृत्व करणार्‍या कोकणातील व्यक्तीमत्वांना अभिवादन व कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वराज्य भूमी कोकण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

12 ऑगस्ट रोजी आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण येथील स्मारकाला अभिवादन करुन या यात्रेला प्रारंभ झाला. पेण तालुक्यातील गागोदे येथील विनोबा भावे यांच्या गावी ही यात्रा पोहोचली. तेथून पुढे सायंकाळी या यात्रेचे अलिबाग येथे आगमन झाले. नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सभेत आंग्रे व यादवराव यांनी उपस्थितांना कोकणातील नररत्नांची माहिती दिली.

Exit mobile version