| कर्जत | प्रतिनिधी |
वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुक्याच्यावतीने दि.23 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, व्यापारी फेडरेशन तसेच विविध सामाजिक, व्यापारी व नागरिक संघटनांना सहकार्याची विनंती करणारी निवेदने देण्यात आली आहेत. निट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दि. 20 जुलै रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज व अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या अनुषंगाने कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना शांततापूर्ण आंदोलनासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, व्यापारी फेडरेशन, व्यापारी संघटना व इतर सामाजिक संस्थांना समाजहित व विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.







