खाडी किनार्‍यांवर विविध पक्ष्यांचे आगमन

| पनवेल । वार्ताहर ।

थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनार्‍यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. किनार्‍यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनार्‍यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे.

निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या खाडीच्या जलाशयात उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आशिया, नेपाळ, तिबेट, लडाख आदी देश-विदेशी पक्ष्यांची रेलचेल असते. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी या थंडीच्या महिन्यात खारघर येथील सेक्टर 17 मधील संजीवनी विद्यालयाच्या समोरील कांदळवने, सेक्टर पंचवीस ते सत्तावीस खारजमीन, पाणथळ परिसरात आणि खाडीकिनार्‍यावर देशविदेशातील स्थलांतरित पक्षी खाद्याच्या शोधात येत आहेत. याशिवाय खारघरमधील डोंगरावरदेखील या पक्ष्यांचा वावर आहे. यात सध्या गोल्डन प्लोव्हर, कॉमन सँडपिपर, सॅण्ड प्लोव्हर, वुडसँडपिपर, कॉमन कुकू, वेडा राघू, सोन चिखल्या, रेड बुलबुल, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर, दाबील, सरग्या, शेकाट्या असे विविध पक्षी प्रामुख्याने दिसून येत आहे.

खारघरमधील डोंगराची रांग, माळरान, खार जमिनी, पाणथळ जागा आणि कांदळवन आदी परिसर पक्षीप्रेमींसाठी सध्या पर्वणी ठरत आहे. त्यात खारघरमधील ज्योती नाडकर्णी, नरेश चंद्रसिंग आणि तरंग सरीन यांनी देखील पक्ष्यांचा हा किलबिलाट कॅमेराबद्ध आहे. गेली तीन वर्षे ही मोहीम सुरू असून पन्नासहून अधिक केली प्रजाती आश्रयाला येत असल्याचे दिसून आले.

Exit mobile version