। पनवेल । वार्ताहर ।
थंडीची चाहूल लागताच निसर्गाचे वरदान लाभलेल्या खारघर खाडीत देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल पहावयास मिळत असून पक्षीप्रेमी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. खारघर, सेक्टर-8, 10, 16, 17 मधील वास्तुविहार तसेच रांजणपाडा आणि मुर्बी गावाच्या मागील बाजुस खाडी आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी विविध रंगी, आकर्षक पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत.
रशिया आणि मध्य आशिया मधील स्थलांतरीत पक्ष्यांचे खारघरमध्ये मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. आफ्रिका देशातील रोहित, सारस बगळे, रेड बुलबुल, बी इटर, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन किंगफिशर, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे, दुर्मिळ ब्लॅक टेलेड गॉडविटस्, कर्ल्यू सँडपायपर्स या पक्षांचा समावेश असल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.