| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पालिका हद्दीतील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांबाबत प्रहार सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी, आरोग्य, अग्निशमन तसेच इतर मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत संघटनेने निवेदन सादर केले होते. मागण्या तातडीने मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेची बैठक पार पडली. बैठकी दरम्यान शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांवर येत्या महिनाभरात आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती प्रहार सामाजिक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिरीषकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाळे, उपायुक्त मुख्यालय कैलास गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, शहर अभियंता संजय कटेकर, उप अभियंता पाणीपुरवठा विलास चव्हाण तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बोडके, डॉ. सुनील शिरीषकर, अजय कदम, राहुल तेलंग, पंकज मोहिते, अभिनव येलवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पालिका आयुक्तांनी मागण्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रहार संघटनेचे प्रस्तावित उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.







