| कळंबोली | प्रतिनिधी |
कळंबोली परिसरातील सिडको कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या झोपडपट्टीमध्ये शेळी फार्मच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अमली पदार्थ विक्रीच्या अड्ड्यावर पनवेल महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे परिसरातील ड्रग्सविरोधी मोहिमेला मोठे बळ मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यापूर्वी 11 मार्च रोजी पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी संदीप निगडे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ड्रग्स माफिया वसीम लुंगी याला अटक केली होती. त्या कारवाईनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करत आज संबंधित ठिकाणावरील अतिक्रमण हटविण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग अतिरिक्त आयुक्त महेश मेघमाले व कळंबोली प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निरीक्षक अरविंद पाटील यांनी कारवाईचे नेतृत्व केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईवेळी ड्रग्स माफिया वसीम लुंगीविरोधातील अटकेची कारवाई करणारे नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी संदीप निगडे हे ही उपस्थित होते. तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करून कथित ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समाजसेविका प्रियांका गाडे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईची पाहणी केली. या संयुक्त कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.







