| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली-कोलाथरे मार्गावरील लोखंडी पूल सध्या अत्यंत जीर्ण, कमकुवत आणि धोकादायक अवस्थेत असून, कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक गावांना जोडणारा व जीवन वाहिनी म्हणून उपयुक्त असणाऱ्या या पुलाची लोखंडी संरचना अनेक ठिकाणी गंजून कमकुवत झाले आहेत, तर पुलावर मोठे खड्डे व तडे पडले आहेत. या पुलावरून चालताना पूल अक्षरशः हलत असल्याने मनात भीती घेऊन नागरिक जीवघेणा प्रवास करीत आहेत. त्यामुळे या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. आमणोली-कोलाथरे धोकादायक लोखंडी पुल मृत्यूचा सापळा बनला असून, नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अटळ असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना प्रशासन मात्र अद्यापही गंभीरपणे दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पावसाळ्यात पुलाखालील पाण्याचा वेग वाढल्यास हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच नोकरदार वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या मार्गाला कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव याच धोकादायक पुलाचा वापर करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी, निवेदने आणि मागण्या करण्यात आल्या. मात्र, अधिकारी केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि मदतीच्या घोषणा करण्यापेक्षा आताच आणि भरभक्कम पूल बांधा, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी ही केवळ आश्वासनांची खैरात न करता तातडीने निधी मंजूर करून नवीन व मजबूत पूल उभारावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, तातडीने नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून उग्र जनआंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आता जागे होणार का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.
यावेळी यशवंत गायकवाड, मारूती गायकवाड, आनाजी मनवे, नारायण शिंदे, गौतम गायकवाड, चंद्रकांत दिने, विष्णू गायकवाड, तुकाराम दिने, मोरेश्वर बोडके, नंदू मुठठ्ल, अनिकेत गायकवाड, सुमित दिने, शेखर दिने, प्रकाश दिने, तानाजी सावंत, योगेश गायकवाड, मंगेश गायकवाड नागेश पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, पुलाच्या दुर्घटनेमुळे परिसरातील इतर जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे येथील पुल सुस्थीतीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी.







