| म्हसळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या श्रीवर्धन एस.टी आगारातील बहुतांश बसगाड्या सध्या जीर्ण अवस्थेत असून, प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. आगार प्रशासनाकडून या गाड्यांचा लांब पल्ल्याच्या मार्गांवर सर्रास वापर केला जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांनी आरामदायी प्रवासासाठी जास्त पैसे मोजून आरक्षित तिकिटे काढली तरी प्रत्यक्षात त्यांना दीड ते दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र श्रीवर्धन आगारात वारंवार दिसून येत आहे. वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने कामानिमित्त, वैद्यकीय उपचारांसाठी किंवा शैक्षणिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
शिवशाही बस सेवेची अवस्था तर अधिकच बिकट झाल्याची चर्चा प्रवासी वर्गात सुरू आहे. अनेक शिवशाही बसमधील वातानुकूलित (एसी) व्यवस्था बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना उकाड्यात अक्षरशः गुदमरून प्रवास करावा लागत आहे. आरामदायी प्रवासाच्या नावाखाली अतिरिक्त भाडे आकारले जात असताना सुविधा मात्र, शून्य असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
काही बसगाड्यांचे दरवाजे, खिडक्या व आसने नादुरुस्त असून त्यावर केवळ तकलादू दुरुस्ती करून गाड्या रस्त्यावर धावल्या जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः घाटमार्ग व लांब अंतराच्या प्रवासात अशा बसगाड्या धावत असल्याने अपघाताचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरही संतप्त प्रवाशांकडून श्रीवर्धन आगार प्रशासनावर जोरदार टीका होत असून, भाडेवाढ मात्र सेवा शून्य अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. जीर्ण बसगाड्या तातडीने बंद करून नवीन बस उपलब्ध कराव्यात, वेळापत्रक नियमित करावे तसेच शिवशाही सेवेची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.







