| मेक्सिको | वृत्तसंस्था |
लिओनेल मेस्सी या वर्षीच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गतविजेत्या अर्जेंटिनानं 2026 फिफा विश्वचषकासाठी आपल्या 26 सदस्यीय अंतिम संघाची घोषणा केली आहे. महान खेळाडू मेस्सी पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करेल. तो आपला सहावा विश्वचषक खेळणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत अर्जेंटिना सलग दुसरं विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशानं सहभागी होईल.
अलीकडेच, 38 वर्षीय मेस्सीला इंटर मियामीकडून खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर इंटर मियामीनं जाहीर केलं की त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे. हा महान फुटबॉलपटू विश्वचषकात सहभागी होईल की नाही याबद्दल चाहत्यांना खात्री नव्हती. मात्र, अर्जेंटिनानं शुक्रवारी मेस्सीच्या सहभागाची पुष्टी केली. मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी अनुभव आणि संतुलनाला प्राधान्य दिलं असून, कतारमध्ये 2022 चा विश्वचषक जिंकलेल्या संघाचा गाभा कायम ठेवला आहे. अर्जेंटिनाच्या संघात 2022 विश्वचषक विजेत्या संघातील 17 खेळाडूंचा समावेश आहे.
तरुण खेळाडूंवर दाखवला विश्वास
प्रशिक्षक स्कालोनी यांनी भविष्याचा वेध घेत अनेक तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. व्हॅलेंटिन ब्राको, निकोलस पाझ आणि ज्युलियानो सिमिओन यांसारख्या तरुण चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, होसे मॅन्युएल लोपेझ आणि थियागो अल्माडा पहिल्यांदाच विश्वचषकाचा अनुभव घेणार आहेत. दुखापतीमुळं 2022 च्या विश्वचषकातून बाहेर पडलेल्या जिओव्हानी लो सेल्सोचं पुनरागमनही महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. अर्जेंटिना 16 जून रोजी अल्जेरियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर गट टप्प्यात संघ जॉर्डन आणि ऑस्ट्रियाचा सामना करेल. मेस्सी अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देईल की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.







