| महाड | प्रतिनिधी |
महाडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाड येथील एसबीसी क्रिकेट अकॅडमीचा युवा आणि प्रतिभावान क्रिकेटपटू आरुष सचिन कोळे याने बीसीसीआयच्या वतीने आयोजित 2026-27 च्या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत आपल्या फलंदाजीचा दमदार ठसा उमटवला आहे. मुंबईच्या 16 वर्षांखालील संघाकडून खेळताना तामिळनाडूविरुद्ध त्याने तब्बल नाबाद 201 धावांची शानदार द्विशतकी खेळी साकारली. 333 चेंडूंचा सामना करत त्याने मिळवलेले हे यश महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
ग्वाल्हेर येथील श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आरुषने फलंदाजीतील संयम, तांत्रिक कौशल्य आणि खेळातील परिपक्वता दाखवून दिली. प्रदीर्घ वेळ मैदानावर टिकून राहत प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा सामना करत त्याने द्विशतक पूर्ण केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.
आरुष हा महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीचा नियमित खेळाडू असून, अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक आवेश अय्युब चिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यामुळेच आरुषने हे यश संपादन केल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन करत भविष्यात भारतीय क्रिकेटमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण करावी, अशा शुभेच्छा दिल्या.
आरुष हा महाडमधील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ. सचिन सुधाकर कोळे आणि डॉ. पूनम सचिन कोळे यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि महाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसबीसी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष बशीर चिचकर, ॲड. दत्ता वाडकर, ॲड. पंकज पंडित, रमेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आरुषचे अभिनंदन केले आहे. महाडच्या मातीतून घडलेला आरुष कोळे आज राष्ट्रीय स्तरावर आपल्या फलंदाजीच्या जोरावर लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या ऐतिहासिक द्विशतकी खेळीने महाडच्या क्रिकेट विश्वात नवा उत्साह निर्माण केला असून, भविष्यात तो भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







