पक्ष्यांच्या किलबिलाटाने रान बहरले

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुका हा ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीतील गुलाबी थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन ठरतो. यावर्षी ही त्याची प्रचिती येत आहे. सध्या पाणजे, नवीशेवा, जेएनपीए बंदर परिसरात विविध जातींच्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चिरनेर, कळंबुसरे, रानसई या परिसरात विविध जातींच्या पक्षाच्या मंजुळ आवाजाचे स्वर डोंगर परिसरात फेरफटका मारल्यास कानावर पडत आहेत. त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.

हवामानातील बदलामुळे स्थानिक अधिवास असणार्‍या ठिकाणी पक्ष्यांना खाद्याची कमतरता भासू लागते. उपासमारीमुळे त्यांचे अस्तित्वही धोक्यात येते. याची पूर्वकल्पना असल्याने अनेक पक्षी स्थलांतराचा मार्ग शोधू लागतात. उरण तालुक्यात दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ वाढते. आपल्या मूळ अधिवासापासून काही पक्षी तर तब्बल 30 हजार किलोमीटरचा प्रवास करतात. समुद्रकिनारी पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसतो; तर जंगल भागांमध्ये शिकारी पक्ष्यांची हजेरी लक्षवेधी असते. त्यात फ्लेमिंगो व इतर जातीचे पक्षी हे पाणथळ भागात भक्ष्याच्या शोधात संचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच चिरनेर, कळंबुसरे, रानसई या गावातील डोंगर परिसरात सुतार, खंड्या, टिटवी, बुलबुल, साळुखी, लावरी, पोपट, कोकीळ, चिऊताई, रान कोंबडा यांसह विविध जातींच्या पक्षाची मधूर किलबिल ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.

Exit mobile version