वेध बाप्पाचे! कारागीरांचा मूर्तींवर अखेरचा हात

। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे ।
बाप्पाच्या आगमनाला काही दिवसांचा काळ राहिला असून, तालुक्यातील गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पांच्या मूर्तीवर रंगांचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून, त्यासाठी बारा ते अठरा तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत. तालुक्यात 55 गणेशमूर्ती कारखाने असून, अंदाजे दहा हजार मूर्ती आकार घेत आहेत. मूर्तीवर अखेरचा हात मारताना दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने कामात येत असलेल्या अडथळ्यांमुळे कारखानदार हैराण झाले आहेत. यावर्षी गणरायाचे आगमन लवकर असल्याने कारखानदारांची घाईगडबड सुरू असल्याचे खारआंबोलीचे नामदेव वरंगे यांनी केली.

मुरुड शहरात 13, एकदरा एक, खारआंबोली दोन, तेलवडे एक, शिग्रे तीन, वनणदे तीन, राजपुरी तीन, आगरदांडा, सावली नांदले, खामदे, उसंडी, माजगाव, तल्लेखर याठिकाणी प्रत्येकी एक कारखाना आहे. यावर्षीदेखील शाडूची माती महागल्याने मूर्तीची किंमत वाढणार आहे. गणेशमूर्ती कारखाने पावसाळ्यात सुरु होतात, त्यादरम्यान विजेची दुरुस्तीची कामे सतत चालू आल्याने सर्व कारखानदारांना खूप त्रास सहन करावा लागतो. तीच कामे वीज मंडळाने एप्रिल महिन्यात करावी, अशी मागणी कारखानदार करीत आहेत.

मुरुड परिसरात साच्यातील मूर्तीचे काम कमी असून, हाताने बनवलेल्या मूर्तीला मागणी जास्त आहे.ही मूर्ती बनवण्यास वेळ जास्त लागतो. सातत्याने वीज खंडित होत असल्याने अखेरच्या दिवसांत कामावर परिणाम होतो. यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाडूच्या मूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांना अनेकवेळा नुकसान सहन करावे लागते, त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

– प्रताप वारंगे, मूर्तिकार

मी नोकरीसाठी मुंबईत असतो, पण गणपतीला मुरुडला गावी खास येतो. आधी मूर्ती सांगण्यासाठी व पाट देण्यासाठी येतो. मुरुडला गणेशमूर्ती आदल्या दिवशी वाजतगाजत आणण्याची परंपरा असून, ती आजही कायम टिकून आहे. येथील सुंदर रेखीव गणेशमूर्ती अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही.

संदीप भागत, रहिवासी


Exit mobile version