| मुंबई | प्रतिनिधी |
कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरुण गवळीने जन्मठेपप्रकरणी आतापर्यंत 17 वर्षे कारागृहात शिक्षा भोगली आहे. त्याचे वय सध्या 76 वर्षे असून, वयाचा विचार करुन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.







