| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथील विद्यार्थीनी अर्वा चिखले हिने जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत 97.50 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच, राज्य स्तरीय मंथन परीक्षेत 300 पैकी 292 (97.33 टक्के) गुण मिळवून उत्तम यश संपादन केले आहे. त्याबद्दल सर्वच स्तरातून तिच्यासह आई-वडील आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले जात आहे. तसेच, तिचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात कुठेही कमी नाहीत हे तिने दाखवून दिले आहे. तिची आई स्मिता चिखले या त्याच शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी देखील अर्वाने रायगड प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता.







