आर्यन मोडखरकर ठरला पहिला खेळाडू
| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचनालय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आंतरशालेय जलतरण स्पर्धेमध्ये आर्यन विरेश मोडखरकर याने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले स्थान मिळवले आहे. शुक्रवारी पुणे, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये आर्यनने बॅकस्ट्रोक या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे. उरणच्या नगर परिषद जलतरण तलावामधून पहिला राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मान त्याने मिळवला आहे.
आर्यन मोडखरकरने संपूर्ण रायगडकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरशालेय स्पर्धांमधील जलतरण स्पर्धेयेच्या बॅकस्ट्रोक या जलतरण प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक मिळवत आपले स्थान राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कायम केले आहे.
उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वी मध्ये शिकणारा आर्यन उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये सराव करत आहे. प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेणाऱ्या आर्यनने आजवर अनेक बक्षिसे मिळवली आहेत. याआधी आर्यनने इंदोर येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. तर नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. पुढील स्पर्धा राजधानी दिल्ली येथे होणार असून, आर्यनच्या कामगिरीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आर्यन आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक हितेश भोईर यांना देत आहे.