भूमीपुत्रांचा सिडकोविराधात एल्गार
| उरण | वार्ताहर |
दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करत सोमवारी (24 जानेवारी) ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या साक्षीने झाले. आजचे लाक्षणिक काम बंद आंदोलन हा तीव्र लढाईचा इशारा आहे. जोपर्यंत दिबासाहेबांचे नाव नाही, तोपर्यंत थांबायचे नाही. लोकांच्या भावना लक्षात न घेता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला, पण मागणी करूनही सिडको अद्यापही ठराव भूमीपुत्रांकडे लेखी स्वरूपात का देत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, असा मत कॉम्रेड भूषण पाटील यांनी मांडला.
प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ-पखवाजाचा ठेका घेत दिबांचा जयजयकार केला. तर, दिबासाहेबांचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सिडको मुर्दाबाद, अशा घोषणांनी भूमीपुत्रांनी आसमंत दणाणून सोडला होता. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले. अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी यावेळी स्प्ष्टपणे दिसत होती. रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, कुंडेवहालचे सरपंच सदाशिव वास्कर, विजय घरत, गोवर्धन डाऊर, दगडू गायकवाड, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.