बाळाराम पाटील यांची माहिती
| पनवेल | प्रतिनिधी |
आज देशभर जो मतचोरीचा मुद्दा गाजतो आहे, तो सर्वात जास्त प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात झालेला आहे. या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 दुबार मतदारांची नावे नोंदलेली आहेत. त्यापैकी 25, 855 हे पनवेल मतदारसंघात दोन वेळा मतदार आहेत. पनवेल आणि उरण या दोन्ही विधानसभा मतदारसंघात 27, 275 नावे आहेत. पनवेल आणि ऐरोली या दोन मतदारसंघात 16, 096 मतदार आहेत. पनवेल आणि बेलापूर या मतदारसंघांमध्ये 15, 397 नावे आहेत. 588 मतदारांचा पत्ता कुठेच लागत नाही, अशी नावे नोंदलेली आहेत, अशी माहिती शेकापचे नेते तथा माजी आ. बाळाराम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, एकूण 85, 211 दुबार मतदार आम्हाला सापडल्यानंतर या विषयावर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी (एस.डी.ओ.) पनवेल, तहसीलदार पनवेल तसेच निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना कल्पना दिली. त्यांना निवेदन देऊन सांगितले की, मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदले गेले आहेत, त्यांना फिल्टर करा. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी 10 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 1 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो आणि सिव्हिल रिट पिटीशन क्र. 13778/2024 दाखल केली. 07/10/2024 रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका ऐकली आणि 11/10/2024 रोजी निकाल देऊन 188 विधानसभा मतदारसंघातून ही नावे कमी करण्याचा आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. परंतु, या निकालाची कुठलीही दखल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आम्ही त्यांना निकालाची प्रत देऊन कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते; परंतु कोणतीही दाद मिळाली नाही. परिणामी, ही नावे मतदारयादीत तशीच राहिली.
त्यानंतरही मी पनवेलचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात दुबार व बोगस मतदार या मतदारसंघात असल्याचे सांगितले. त्यांच्यावर वगळण्याची कारवाई होत नसल्यास, किमान त्यांचे मतदान होऊ नये यासाठी काहीतरी व्यवस्था करण्याची विनंती केली. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. या मतदारसंघात 11, 600 मतदारांनी दुबार मतदान केले आहे. नमुना दाखल काही फोटोही आम्ही जुळवलेले असून, विधानसभा मतदारसंघांमध्ये दुबार मतदान झालेले आहे, हे स्पष्ट दिसते, असे बाळाराम पाटील यांनी सांगितले. राहुल गांधींनी हा विषय घेतला आहे आणि ते सुरुवातीपासून जे म्हणत होते ते तंतोतंत खरं आहे. वोट चोरी नक्कीच झालेली आहे आणि महाराष्ट्राचा निकाल ही अशी वोट चोरी करूनच मिळवला आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
दुबार मतदारांविरुद्ध हायकोर्टाच्या निकालानंतरही कारवाई होत नसेल, तर संबंधित निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही पुन्हा एकदा हायकोर्टाची पायरी चढण्याचा निर्धार केला आहे. राहुल गांधी जे बोलतात ते तंतोतंत खरं आहे आणि पनवेलसारखा ठळक पुरावा दुसरीकडे मिळणार नाही. पनवेलमध्ये याचा अगदी उच्चांक झाला आहे, कहर झाला आहे. साऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि राहुल गांधींनी जी मोहीम निवडणूक आयोगाला जागं करण्यासाठी चालू केली आहे, त्याला सहकार्य करावे. कारण महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, भारताचे निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी कोणाच्याही लक्षात ही गोष्ट घेतली गेली नाही. लोकशाहीची हत्या करण्यामागे या सर्वांचा सहभाग आहे, हे ठळकपणे दिसून येते. एकाच मतदारसंघात दोन वेळा मतदान करणारे 11, 600 मतदार सापडलेले आहेत, अशी माहिती बाळाराम पाटील यांनी दिली.







