आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नेमबाजी केंद्र भिंतीआड

कार्ले ग्रामस्थ धोक्याबाहेर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
परहूरपाडा येथील पोलीस नेमबाजी प्रशिक्षणादरम्यान सुटणार्‍या गोळ्या कार्ले गावात पडत असल्याने ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी रायगड पोलिसांना निर्देश देत सदर प्रशिक्षण केंद्र हलवा किंवा सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानुसार रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेऊन नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. या भिंतीमुळे कार्ले गावातील धोका टळणार असल्याने ग्रामस्थांनी आ. जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे रायगड पोलिसांचे गोळीबार मैदान आहे. 2 मे 1987 साली नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले. सुमारे एक एकर क्षेत्रात असलेल्या या केंद्रामध्ये रायगड पोलिसांसह ठाणे, नवी मुंबई व अन्य पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांचे नेमबाजी प्रशिक्षण घेतले जाते. याच प्रशिक्षण केंद्रापासून काही अंतरावर कार्ले गाव आहे. या गावांमध्ये खिडक्या, पत्र्यांद्वारे बंदुकीच्या गोळ्या घरात घुसल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे येथील ग्रामस्थांवर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली होती. 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास बंदुकीची एक गोळी कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या सिंटेक्सच्या टाकीला छेदून आत घुसली. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेसह आठ वर्षाच्या मुलांचा जीव बचावला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन आ. जयंत पाटील यांना साकडे घालत सदर संकटापासून मुक्त करण्याची विनंत केली होती. त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना लेखी पत्र देत या झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अशी घटना पुन्हा घडणार नाही, याबाबत उपाययोजना करावी, असे निर्देश दिले होते. त्याची दखल घेत रायगड पोलिसांनी कार्ले येथील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली असून, नेमबाजी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे. यासाठी 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आहे. या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, या ठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

Exit mobile version