कर्जत पं.स.च्या उपसभापतीपदी शेकापच्या जयवंती हिंदोळा बिनविरोध

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदावर शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या भीमाबाई पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती भीमाबाई पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी विक्रम देशमुख यांच्याकडे निर्धारित वेळेत शेतकरी कामगार पक्षाच्या पाथरज गणातून निवडून आलेल्या सदस्या जयवंती दत्तात्रय हिंदोळा यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. जयवंती हिंदोळा यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून शेकापच्या खांडस गणाच्या सदस्या कविता ऐनकर यांची सही होती. दुपारी दोन वाजता झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी विक्रम देशमुख यांनी उपसभापतीपदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाल्याने उपसभापतीपदावर जयवंती हिंदोळा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेला पंचायत समिती सदस्य कविता ऐनकर, राहुल विशे, सुजाता मनवे, अमर मिसाळ, प्रदीप ठाकरे, भीमाबाई पवार, काशिनाथ मिरकुटे, जयवंती हिंदोळा आणि सभापती सुषमा ठाकरे आदी उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य अनुपस्थित राहिले. शेतकरी कामगार पक्षाचा उपसभापती व्हावा यासाठी सत्ताधारी आणि पूर्ण बहुमत असलेल्या शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला होता.
उपसभापतीपदावर हिंदोळा यांची निवड झाल्यानंतर कर्जतचे आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे, शेकापचे नेते विलास थोरवे, समाजकल्याण समितीचे माजी सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या सीमा पेमारे, सेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, माजी उपसभापती मनोहर थोरवे, सेनेचे तालुक्यातील पदाधिकारी तसेच शेकापचे युवक संघटना अध्यक्ष वैभव भगत, जांबरुंग ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय पिंपरकर, पांडुरंग बदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य पदाधिकारी बनला असून, हिंदोळा यांच्या निवडीबद्दल कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षात आणि आदिवासी समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Exit mobile version