वीज बिल प्रति युनिट महागल्याने त्याचा फटका ग्राहकाला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जुलै महिन्यात वारंवार खंडित होत असलेला वीजपुरवठा एकत्रित केला, तर आठ ते दहा दिवस भरतील एवढा होता. त्यामुळे या महिन्याचे बिल कमी येईल, असा अंदाज ठेवणार्‍या वीज ग्राहकांना महावितरणने आकारलेल्या भरमसाठी वीज बिलामुळे शॉक बसला आहे. महावितरणने ‘इंधन समायोजन आकार’ या शुल्कात तब्बल 600 ते 700 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना जुलै महिन्यापासून सरासरी 1.35 रुपये प्रति युनिट अधिक द्यावे लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वीजवितरण कंपन्यांना वीजखरेदी खर्च वाढल्यास त्यापोटी ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्याची मुभा असते.

महावितरणने या खर्चापोटी 1500 कोटी रुपये एप्रिल 2020 मध्ये राखीव ठेवले होते. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबरदरम्यान भीषण कोळसा टंचाईदरम्यान महावितरणचा वीजखरेदी खर्च वाढला. त्यामुळे 1500 कोटी रुपये डिसेंबरअखेरीस संपले. त्यानंतर मार्च-एप्रिलदरम्यान पुन्हा कोळसा संकट व वाढत्या वीज मागणीमुळे महावितरणला बाजारातून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. अशा सर्व स्थितीत ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपन्यांना मार्च 2022पर्यंत निर्बंध आणले होते. पण, एप्रिल 2022पासून त्यास मुभा दिली. त्यानुसार महावितरणने एप्रिल महिन्यात आलेल्या देयकापासूनच ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्यास सुरुवात केली.

पण, जूनच्या देयकापर्यंत वसूल केला जाणारा आकार व आता जुलै ते ऑक्टोबरचा आकार, यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तिपटीने अधिक आहे. घरगुती ग्राहकांचा विचार केल्यास, मार्च ते एप्रिलसाठीचा किमान इंधन समायोजन आकार 5 पैसे प्रति युनिट, तर कमाल 25 पैसे प्रति युनिट इतका होता. पाच श्रेणींचा विचार केल्यास सरासरी दर हा 17 पैसे प्रति युनिट होता. मात्र, हाच दर आता जुलै ते ऑक्टोबरदरम्यान येणार्‍या वीज देयकासाठी सरासरी 1.35 रुपये प्रति युनिट झाला आहे. यानुसार आता प्रत्येक घरगुती ग्राहकाचे देयक ऑक्टोबरपर्यंत सरासरी 1.35 रुपये प्रति युनिटने महागली आहे.

Exit mobile version