भातबियाणे चांगले उगवल्याने राब हिरवेगार

शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात भाताची शेती खरीप हंगामात प्रामुख्याने केली जाते. गेल्या अनेक दशकांचा अंदाज पाहता मान्सूनची सुरुवात सात जून रोजी होत असते. त्यानुसार भाताचे राब शेतकरी तयार करण्यास घेत असतो. त्यानुसार तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपली राब पेरणीची कामे पूर्ण केली आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केली असल्याची माहिती कर्जत तालुका कृषी विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भाताची रोपे (राब) जमिनीच्या वर आली असून, अनेक ठिकाणी भाताच्या राबामुळे शेतातील काही भाग हिरवागार दिसू लागला आहे.

भाताच्या शेतीचे कोठार म्हणून कधीकाळी कर्जत तालुका ओळखला जात होता. त्यात 1980 च्या दशकात कर्जत तालुक्यात फार्महाऊस सुरु झाले आणि तालुक्यातील भाताचे क्षेत्र कमी झाले. तरीदेखील कर्जत तालुक्यात खरीप हंगामात साधारण दहा हजार हेक्टरवर भाताची शेती केली जाते. तर, उन्हळ्यात रब्बी हंगामातदेखील किमान दोन हजार हेक्टर जमिनीवर भाताची दुबार शेती केली जाते. मात्र, शेतकरी मे महिन्याच्या अखेरीस भाताची मशागत सुरु करीत असतो. त्यानुसार पहिल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन पाच जूनपासून शेतकर्‍यांनी भाताच्या बियाण्यांची पेरणी सुरु केली होती. त्यानुसार भाताचे राब भरणी करण्याचे काम कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी पूर्ण केले आहे. भाताच्या राबासाठी लागणारे पावसाचे पाणी काही दिवस सुरु आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांच्या शेतात टाकण्यात आलेल्या भाताच्या बियाणांचे उगवणे प्रक्रिया सुरु असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे बळीराजा खुश असल्याचे दिसून येत आहे.

कर्जत खरेदी विक्री संघ, कर्जत भात संशोधन केंद्र आदी ठिकाणी भात बियाण्यांची विक्री सुरु होती. त्याचवेळी कृषी औषध विक्रेते यांच्याकडेदेखील भाताचे बियाणे उपलब्ध होते. तर काही शेतकरी हे आपल्या शेतामधील भाताच्या पिकातील भातदेखील बियाणे म्हणून ठेवून देत असतात. आतापर्यंत सर्व शेतकर्‍यांनी राब भरणी करून घेतली असून, पेरण्यांसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. समाधानकारक पाऊस यामुळे बळीराजा समाधानी आहे. आता भाताच्या रोपांसाठी चांगल्या पावसाची गरज असून, शेतकर्‍यांना आता जोरदार पावसाची ओढ लागली आहे.

Exit mobile version