आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

श्री वाघेश्वर प्रसन्न आंबिवली यांच्यावतीने सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाज असोसिएशनच्या मान्यतेने शनिवारी (दि.2) कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत संघांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना आसनेवाडी विरुद्ध सिद्धेश्वर या दोन संघात पार पडला. यावेळी आसनेवाडी संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळ करत अंतिम विजयावर शिक्का मोर्तब केले. या संघाला रोख रक्कम 5 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक सिद्धेश्वर या संघाला रोख रक्कम 3 हजार रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय क्रमांक वावलोळी आणि चतुर्थ क्रमांक उन्हेरे या दोन्ही संघाला प्रत्येकी 2 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई शुभम वाघमारे, उत्कृष्ट पक्कड मोरेश्वर वाघमारे या खेळाडूंना देखील आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version