भत्ता देण्यास जिल्हा प्रशासन उदासीन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेसह पंचायत समितीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तसेच मतदानाच्या वेळी मतदारांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा मात्र दुर्लक्षित असल्याचे समोर आले आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार स्लीप वाटण्याचे काम करणाऱ्या आशा सेविकांना अद्याप भत्ता देण्यात आलेला नाही. सरकारने त्यांच्याकडून मोफत काम करून घेतल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 व पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणुकीची लढत झाली. जिल्ह्यात 502 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. त्यात जिल्हा परिषदेचे 173 व पंचायत समितीचे 329 उमेदवार होते. 7 फेब्रुवारीला मतदान झाले. त्या निमित्ताने मतदारांपर्यंत शासकीय पध्दतीने मतदार स्लीप वाटप करण्याचे काम आशा सेविकांकडे सोपविण्यात आले. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन 17 लाख मतदारांपर्यंत पोहचून त्या मतदार स्लीप वाटप करण्याचे काम केले. जिल्ह्यात 2 हजार 323 मतदान केंद्र होते. या मतदान केंद्रामध्ये आशा सेविकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आरोग्य कीटसह मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम आशा सेविकांनी केले. सकाळी सात वाजल्यापासून मतदान होईपर्यंत सायंकाळपर्यंत आशा सेविका मतदान केंद्राच्या बाहेर बसून होत्या. शासनाने दिलेली जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पार पाडली. निवडणूकीत काम केल्यावर अनेकांना निवडणूक भत्ता दिला जातो. मात्र आशा सेविकांना हा भत्ताच दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.
