| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अशोक सराफ यांनी पाच दशकांहून अधिक काळ आपल्या कसदार अभिनयानं नाट्य आणि चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं. मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट, मालिका सर्वत्र अशोक सराफ यांचा थक्क करणारा वावर राहिला आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. निवेदिता जोशी या त्यांच्या पत्नी आहेत.