आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी भरारी

साकारले बिबट्या रक्षक चिलखत

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माणगाव वाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शनात मोठी भरारी घेतली आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात मांडलेले बिबट्या रक्षक चिलखत या प्रतिकृतीला जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, बिबट्याने हैदोस घातला असल्याने बिबट्या रक्षक चिलखत ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधत आहे.

गेल्या काही महिन्यांत बिबट्या आपला आदिवास सोडून मानव वस्तीत प्रवेश करू लागला आहे. त्यात अनेकांचे जीव गेले असून मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील हल्ले वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील मुलांनी एक नवी शक्कल लढवत ती प्रतिकृतीतून जिल्हा विज्ञान प्रदर्शनात मांडली. त्यात माणगाव वाडी येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी विकास हिंदोळे या सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने यावेळी बिबट्या रक्षक चिलखत ही प्रतिकृती सादर केली. त्याची ही प्रतिकृती रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिली. दरम्यान, कर्जत तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये बिबट्या रक्षक चिलखत ही प्रतिकृती प्राथमिक विभागात आदिवासी गटामध्ये प्रथम आली होती. त्यानंतर जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये आदिवासी विभागात देखील प्रथम आली असून ती प्रतिकृती आता राज्य पातळीवर पोहचली आहे.

बिबट्याच्या हैदोसाने सर्व हैराण आहेत. त्यावर राज्य सरकार देखील हतबल आहे. त्यात आदिवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी विकास हिंदोळे याने आपले मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य घेऊन बिबट्या रक्षक चिलखत ही उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे चिलखत टाकावू पासून टिकावू अशा स्वरूपात बनवले गेले आहे. त्यात शेतकरी, मेंढपाळ आणि वन कर्मचारी यांच्यासाठी ही तंत्रद्यान मदतगार ठरेल असा विश्वास आहे. तसेच, जंगलात चारा खाण्यासाठी गेलेले जनावरे, कुत्रे, शेळ्या यांचे रक्षण हे चिलखत करू शकते, असा दावा देखील त्याने केला आहे


या चिलखतात लोखंडी खिळे बसवले असून आपल्या अंगावर बिबट्याने झडप घातली तर त्यावेळी बिबट्याच्या अंगात खिळे टोचून तो जखमी होऊ शकतो. तर, कोणताही प्राणी मानेवर हल्ला करतो हे लक्षात घेऊन त्या बिबट्या रक्षक चिलखतमध्ये मानेचा खास पट्टा बनवून घेतला आहे. त्या पट्ट्यात लोखंडी लहान खिळे लावले असून त्या आधारे आपले रक्षण होऊ शकते. हा बिबट्या रक्षक चिलखत बनविण्यासाठी काहीही मोठा खर्च येत नाही. या प्रकल्पामध्ये मुख्याध्यापक नंदकुमार इकारे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

विकास हिंदोळे, विद्यार्थी

Exit mobile version