तळवळी तर्फे अष्टमी सरपंचाचा पतीसह उपद्व्याप

ग्रामसभेतील ठरावाला झुगारत कार्यालयीन इमारतीवर हातोडा
कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। धाटाव । वार्ताहर ।
रोह्यातील तळवळी तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी पतीसह चांगलाच उपद्व्याप केल्याची घटना समोर आली आहे. कोस्तेकर दाम्पत्यांनी ग्रामसभेतील ठरावाला झुगारत पंचायतीच्या कार्यालयीन इमारतीवर हातोडा चालवत ती जमीनदोस्त केली आहे. याप्रकरणी संबंधित आस्थापनांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सबके साथ सबका विकास या बोध वाक्याला रोह्यातील तळवळी तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि त्यांच्या पतीने आपला मनमानी कारभार चालवीत चांगलाच ब्रेक दिला आहे. येथील ग्रामपंचयतीची जुनी इमारत तोडू नये व जागेवर कोणीही बांधकाम करू नये असा ग्रामपंचायतम ध्ये ठराव झाला असतानाही, या ठरावाला झुगारून सरपंचांच्या प्रतापामुळे ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. याबत रोहा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून, त्यांचे पती रघुनाथ कोस्तेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतमध्ये सध्या रुपाली कोस्तेकर या सरपंच म्हणून काम करीत आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून हुकूमशाही आणि स्वतःच्या मनमानी पद्धतीने ग्राम पंचायतीचा कारभार सुरू असून मागील काही महिन्यांपूर्वी गट नं.351 असेसमेंट नं.111 वरील ग्राम पंचायत मालकीची असलेली जुनी इमारत कोणतीही शासकीय परवानगी अथवा कोणताही ठराव मंजूर नसताना 15 जुलै 21 रोजी पाडण्यात आली.
दरम्यान, ही इमारत तोडण्यात येऊ नये असा अर्ज दाखल करणार आला होता, तर 30 जुलै रोजी मासिक सभेत जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला होता.
घटित प्रकाराबाबत सरपंच व त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार कोलाड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी इमारत तोडू नये या ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जासह मासिक सभेत सदर जागेवर कोणतेही बांधकाम करू नये हा ठराव घेतला असताना त्याचप्रमाणे सरपंच विश्‍वासात घेऊन काम करीत नसल्याच्या सदस्यांच्या नाराजीमुळे केवळ हव्यासापोटी व ठेक्याच्या कामासाठीच ही इमारत तोडली असल्याची खमंग चर्चा मात्र सर्वत्र एकावयास मिळत आहे.गावच्या जबाबदार सरपंचांकडून ग्रामपंचयतमध्ये एका मागोमाग एक होत असलेले गैर प्रकार गावाच्या विकासासाठी खरोखर लाभदायक आहेत का? असा प्रश्‍न आता समोर येत आहे.
याप्रकरणी ग्रामसेविका गवळी यांनी सदर तक्रार केली असून, कोलाड पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गद्शनाखाली चौकशी अंती रघुनाथ कोस्तेकर याच्यावर कलम 3 व 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समंधीतास कोलाड पोलीस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली असून, मंगळवार दि.23 रोजी कोर्टात हजर करणार असल्याचे तपास अमलदार शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version