भारताकडून मलेशियाचा धुव्वा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा 9-0 असा धुव्वा उडवला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणार्या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. भारताकडून वंदना कटारिया (8 आणि 34वे मिनिट), नवनीत कौर (15 आणि 27वे मि.), शर्मिला (46 आणि 59वे मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर दीप ग्रेस एक्का (10वे मि.), लालरेमसिआमी (38वे मि.) आणि मोनिका (40वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.