वासिम आक्रम यांचे रोखठोक प्रतिपादन
| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |
यंदाची आशिया चषक स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय कठीण जाणार आहे. मात्र तरीही भारत, पाक, श्रीलंका हे विजयाचे प्रबळ दावेदार ठरु शकतात, असा दावा माजी कर्णधार वासिम आक्रम यांनी व्यक्त केले आहे. बुधवारपासून आशिया चषकाची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील मुलतानमधील पहिल्या सामन्याने होत आहे, परंतु सर्वांच्या नजरा 2 सप्टेंबर रोजी कॅन्डीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर असतील. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी कर्णधाराने आपली मते रोखठोक मांडली. भारत असो वा पाकिस्तान किंवा श्रीलंका, प्रत्येक गोलंदाज 10 षटके टाकण्यास सक्षम आहेत की नाही हे तपासायला आवडेल कारण आजकाल त्यांना एका सामन्यात चार षटके टाकण्याची सवय झाली आहे,असे तो म्हणाला.
आशिया चषक 2023 गेल्या वर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, मात्र यावेळी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. माझ्या मते हे आशियाई क्रिकेट परिषदेचे स्वागतार्ह पाऊल आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये आशिया चषक आयोजित करणे चांगली कल्पना आहे कारण, त्यानंतर लगेचच विश्वचषक होणार आहे.
वासिम आक्रम, माजी कर्णधार
यावेळी कोणता संघ आशिया चषक जिंकू शकतो असं तुम्हाला वाटत? या प्रश्नावर त्याने मागच्या आशिया चषकाची आठवण करून दिली. सर्वांनी भारत आणि पाकिस्तान अंतिमफेरीत येतील असे भाकीत केले होते पण शेवटी श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, गेल्या वेळी आम्ही म्हणालो होतो की, भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आशिया चषकाची फायनल खेळतील पण नेमकी श्रीलंका फायनलला आली आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली. पुढे तो म्हणाला, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीन संघ धोकादायक आहेत. जो त्या दिवशी चांगला खेळेल तो संघ जिंकू शकतो. इतर संघही खेळायला आले आहेत, गेल्या वेळी श्रीलंका जिंकला होता. भारत मागच्यावेळी अंतिम फेरीसाठीही पात्र ठरू शकला नव्हता. होय, भारत-पाकिस्तान सामना खूप महत्त्वाचा आहे, पण इतर संघही खेळायला आले आहेत. श्रीलंका आणि बांगलादेशकडेही तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.असे तो म्हणाला.
भारताचा संतुलित संघ
माजी पाकिस्तानी खेळाडू वसीम म्हणाला, मला वाटते की भारताने आतापर्यत वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावले आहे, विशेषत: टी-20 फॉरमॅटमध्ये ते नवीन खेळाडूंना संधी देत आहे आणि त्याच्याकडे एक नवीन कर्णधारही आहे. आताचा त्यांचा संघ संतुलित आहे पण भारत किंवा इतर कोणत्याही संघासाठी हे काम सोपे नाही. यंदाची आशिया चषक स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय कठीण जाणार आहेे. त्यामुळे या सर्वांची कामगिरी कशी होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी 50 षटकांच्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.याकडेही त्याने लक्ष वेधले.