आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर

पुन्हा भारत पाकिस्तान सामना रंगणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आशिया क्रिकेट काऊन्सिलने मंगळवारी (दि.25) मोठी घोषणा केली आहे. आगामी महिला आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा देखील ही स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जाणार आहे. महिला आशिया चषक 2024 स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाणार असून डंबुलामध्ये सामने खेळले जाणार आहेत. 19 जूलै रोजी स्पर्धेला सुरूवात होणार असून 28 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे. उपांत्य सामने 26 जुलै रोजी होणार आहेत.

या स्पर्धेत आशिया खंडातील 8 महिला संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय महिला संघाचा साखळी फेरीसाठी ‘अ’ गटात समावेश असून भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या देशांच्या महिला संघांचा समावेळ आहे. ‘बी’ गटात बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड या देशांच्या महिला संघांचा समावेश आहे. साखळी फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील. साखळी फेरीत प्रत्येक दिवशी दोन सामने होणार आहेत. प्रत्येक दिवशी एक सामना दुपारी 2 वाजता, तर दुसरा सामना संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे. साखळी फेरीत भारताचा पहिला सामना 19 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार असून त्यानंतर 21 जुलै रोजी युएईविरुद्ध भारताचा सामना होईल, तर नेपाळविरुद्ध 23 जुलैविरुद्ध भारताचा अखेरचा साखळी सामना होईल. या स्पर्धेतील सर्व सामनाधिकारी महिला असणार आहेत, हे यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

भारताचे सामने
19 जुलै विरुद्ध पाकिस्तान संध्या. 7.00वा.
21 जुलै विरुद्ध युएई दु. 2.00 वा.
23 जुलै विरुद्ध नेपाळ संध्या. 7.00 वा.
Exit mobile version