श्रीलंकेत होणार आशिया चषक..

पाकिस्तानचे यजमानपद जाणार?

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आगामी आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषद ही स्पर्धा पाकिस्तानमधून हलवण्याच्या तयारीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, आशिया चषक 2023 आता पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत हलवण्यात आला आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. पाकिस्तानही या स्पर्धेवर बहिष्कार घालू शकतो. यावेळी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो खुली असून, तो कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

जर आशिया चषक 2023 श्रीलंकेत गेला तर तो डांबुला आणि पल्ल्‌‍लेकल्ले येथे आयोजित केला जाऊ शकतो. कोलंबोमध्ये सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा हंगाम असतो. त्यामुळे ही दोन शहरे फायनल होऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आला तर सहा देशांची स्पर्धा होईल. अन्यथा ते भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या पाच देशांमध्ये होऊ शकते. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार घातला तर 2023 च्या विश्वचषकात सहभागी होणार की नाही यावरही संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत बोर्ड आणि एसीसी या दोघांकडूनही घोषणेची प्रतीक्षा आहे.

Exit mobile version