सिंधू, प्रणोयचे आव्हान संपुष्टात

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांचे अपयश

। निंगबो । वृत्तसंस्था ।

भारतीय खेळाडूंची आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील सुमार कामगिरी गुरुवारीही कायम राहिली. महिला विभागात पी. व्ही. सिंधू व पुरुष विभागात एच. एस. प्रणोय या दोघांचाही पराभव झाला. त्यामुळे या दोघांचेही प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

चीनच्या हॅन युई हिने सिंधूची कडवी लढत 21-18, 13-21, 21-17 अशी मोडून काढली. चीन तैपईच्या लिन चून यी याने प्रणोय याच्यावर 21-18, 21-11 असा विजय साकारला. पी. व्ही. सिंधू हिने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात केली.8-4 अशी आघाडी घेणार्‍या सिंधूने पुढे जाऊन आपला खेळ उंचावला आणि ही आघाडी 14-8 अशी पुढे नेली; मात्र यानंतर हॅन हिने सिंधूकडून झालेल्या चुकांचा फायदा घेतला. चीनच्या खेळाडूने प्रदीर्घ रॅलीचा खेळ करीत सिंधूला थकवले व 15-15 अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिने 21-18 असा पहिला गेम आपल्या नावावर केला. सिंधूने दुसर्‍या गेममध्ये आक्रमक खेळ केला. तिच्या आक्रमणासमोर हॅन हिचा निभाव लागला नाही. अखेर 21-13 अशी बाजी मारण्यात सिंधूला यश मिळाले. दरम्यान, महिला दुहेरीत तनीषा क्रॅस्टो – अश्‍विनी पोन्नाप्पा या भारतीय जोडीलाही पराभवामुळे निराश व्हावे लागले.

संधी गमावली
पी. व्ही. सिंधू - हॅन युई यांच्यामध्ये तिसर्‍या गेममध्ये चुरस पाहायला मिळाली. सिंधू हिने सुरुवातीला 8-4 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली; पण हॅन हिने झोकात पुनरागमन करताना 10-10 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधू बॅकफूटवर गेली. हॅन हिने 17-10 अशी आघाडी मिळवली. सिंधूने थोडीफार झुंज देताना ही आघाडी 20-17 अशी कमी केली; पण तिला काही विजय मिळवता आला नाही. हॅन हिने 21-17 असा हा गेम जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. हॅन हिने सिंधूला प्रथमच नमवले. सिंधूने याआधी तिच्याविरुद्ध पाच सामने जिंकले होते.
सरळ दोन गेममध्ये मात
एच. एस. प्रणोय - लिन चून यी यांच्यामधील लढतीत पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला; मात्र ब्रेकपर्यंत लिन याने 11-7 अशी आघाडी घेतली. प्रणोयने तोडीस तोड खेळ करीत 15-15 अशी बरोबरी साधली. लिन याने 21-18 असा पहिला गेम जिंकताना प्रणोयला मागे टाकले. दुसर्‍या गेममध्ये लिन याने ड्रॉप शॉटस् व आक्रमक स्मॅशेसच्या जोरावर प्रणोयवर वर्चस्व गाजवले. हा गेम त्याने 21-11 असा जिंकला व विजयासह आगेकूच केली.
Exit mobile version