आशियाई क्रीडा स्पर्धा; भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध

रोईंगमध्ये कांस्यपदक


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघाने 10 मीटर एअर रायफल्स प्रकारात सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. या संघामध्ये रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या खेळाडूंचा समावेश होता. या तिघांनी भारताला आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून देत वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनी 1893.7, 04 गुण मिळवले. यासह त्यांनी चीनचा जागतिक विक्रम मोडीत काढला.

10 मीटर एअर रायफल्स संघातील रुद्रांक्षने 632.5 असे सर्वाधिक गुण मिळवले. रुद्रांक्ष सातत्याने या क्रीडा प्रकारात शानदार कामगिरी करत यश संपादन करत आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाटील हा 2006 नंतर अभिनव बिंद्रानंतर दुसरा भारतीय ठरला होता. मूळचा ठाण्याचा असलेला रुद्रांक्ष हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने नेमबाजीचा वर्ल्ड कप जिंकला आणि डिसेंबर 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. 2022च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून त्याने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही जिंकले आहे. आशियाई गेम्समधील एकूण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.

रोईंगमध्ये कांस्यपदक
भारताला आजच्या दुसऱ्या दिवशी आणखी एक पदक मिळालं आहे. जसविंदर सिंह, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंह यांनी रोईंगच्या पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या बलराज पनवारचं रोईंगमधील पदक हुकलं. बलराजनं पुरुष एकेरी स्कल्सच्या अंतिम फेरीत चौथं स्थान पटकावलं. या स्पर्धेत चीननं सुवर्ण, जपाननं रौप्य आणि हाँगकाँगनं कांस्यपदक जिंकले.

Exit mobile version