कर्जत-नेरळ रस्त्यावरील डांबरीकरण आठ दिवसात उखडले

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. आता मात्र आठ दिवसातच डांबर उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला याबाबत दंड आकारावा अशी मागणी जोर धरत आहे.

सदरचा रस्ता हा 21 किलोमीटर लांबीचा असून हा रस्ता शासनाच्या हायब्रीड तत्वावर तयार करण्यात आला आहे. 2019 मध्ये या रस्त्याच्या अर्ध्या भागात काँक्रीटीकरण आणि अर्ध्या भागात डांबरीकरण असे नियोजन केले आहे. त्यानुसार कर्जत चारफाटापासून वडवली गावापर्यंत हा रस्ता काँक्रीटचा बनविला आहे. दुपदरी मार्गिका असलेला हा कर्जत-नेरळ रस्ता वडवलीपासून शेलू या रायगड जिल्हा हद्दीपर्यंत डांबरीकरणाने बनविण्यात आला आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याबाबतचा करार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. पुढील 10 वर्षे या कराराची मुदत आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रस्त्याची दुरुस्ती केली जाते.

मागील काही दिवस आधी या रस्त्यावर वडवलीपासून पुढे नेरळपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सदरचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालताना त्रास होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Exit mobile version