| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे ग्रामपंचायतीमधील सालपे गावाला डांबरीकरण सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून सुरु आहे. त्याचवेळी सालपे गावातून हा रस्ता खांडपे ग्रामपंचायतीमधील मुळगाव येथे पोहोचला आहे. दरम्यान, एमएमआरडीएकडून तीन किलोमीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी 20 लाखाचा निधी मंजूर आहे.
तालुक्यातील कोंदिवडे आणि खांडपे ग्रामपंचायत मधील तीन गावे जोडणारा रस्ता अनेक वर्षांनी डांबरीकरण करून गुळगुळीत होत आहे. कोंदिवडे गावाच्या वेशीवरून सालपे गावाकडे हा रस्ता पोहोचला असून, तो रस्ता पुढे खांडपे ग्रामपंचायतीमधील मुळगाव येथे पोहचतो. या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून एक कोटी 20 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यावर एक महिन्यापूर्वी बीबीएम डांबरीकरण करण्यात आले होते आणि सध्या तेथे कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे अनेक वर्षांनी हा रस्ता बनविला जात असल्याने कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून समजल्या जाणार्या सालपे गावातील ग्रामस्थांनी आ. महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहेत.