पाली बल्लाळेश्‍वर मंदिराकडे जाणारा रस्ता चकाचक

। सुधागड । वार्ताहर ।

पाली अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्‍वर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे बिकट अवस्था झाली होती. गणपती सण असल्याने हा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती. काही तांत्रिक कारणामुळे या रस्त्याचे काम होत नव्हते. मात्र, रामेश्‍वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचके यांनी स्वखर्चाने नुकतेच या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण केले. परिणामी, बल्लाळेश्‍वर मंदिराकडे व इतर गावाला जाणारे भाविक तसेच नागरिकांचा मार्ग सुकर झाला.

हा रस्ता तातडीने सुस्थितीत व्हावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. गणपती सण आल्यामुळे मुंबई, पुणे आदी शहरांतील व जिल्ह्यातील चाकरमानी गणपती सणासाठी आपापल्या गावात याच रस्त्याने जातात व येतात. तसेच बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल असते. येथील सबरजिस्टर कार्यालय ते बल्लाळेश्‍वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.

मात्र, आता या रस्त्याची पूर्णपणे डांबरीकरण झाल्यामुळे पालीकर जनता तसेच सुधागडवासी आणि बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. नगराध्यक्षा प्रणाली शेळके व नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरुणकर यांच्या हस्ते नारळ वाढवून डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली.

Exit mobile version