नगरपंचायतीचे जाणून बुजून दुर्लक्ष; स्थानिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीतील गांधी चौक व श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची गळती लागली आहे. या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यातच परिताचा पाऊस धुमाकूळ घालत असून या गळतीमुळे रस्त्यावर चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, या फुटलेल्या पाण्याच्या वाहिनीतून दुषीत पाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भिती देखील वर्तविली जात आहे. असे असतानाही नगरपंचायत याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
जिल्ह्यात परतिचा पाऊस धुमाकूळ घालत असतानाच सुधागड तालुक्यात पाण्याची वाहिनी फुटून गळती लागली आहे. येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ ज.नौ. पालीवाला वाणिज्य महाविद्यालय, तसेच अमूल आईस्क्रीम दुकानासमोरील भागात नळजोडणीच्या ठिकाणी सतत पाणी गळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले आठ ते 15 दिवस ही गळती सुरू असून या गळतीकडे पाली नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच, गांधी चौक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथील गणपती मंदिर परिसरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे येणाऱ्या भाविकांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यातूनही नाराजीचे सुर उमटत आहेत. एकीकडे शहरात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. ही परिस्थिती नागरिकांच्या पाण्याच्या हक्कावर अन्याय करणारी ठरत आहे. तसेच, फुटलेल्या वाहिनीतून दुषीत पाणी जाऊन त्याचा स्थानिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
त्यामुळे अशा ठिकाणी पाण्याची गळती सुरू असताना नगरपंचायतीला ती दिसत नाही का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी, तात्काळ गळती दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली आहे. तसेच, नगरपंचायतीने दैनंदिन देखभाल यंत्रणा सक्षम करावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
पाली शहरातील पाण्याच्या गळतीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती प्रतीक्षा पालांडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत गळतीग्रस्त भागांची यादी तयार करून दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत
पाली शहरातील ज्या ज्या ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे तसेच पाण्याचा अपव्यय होत आहे, त्या सर्व ठिकाणी नगरपंचायतीने तात्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे.
पी. सी. पालकर,
ग्रामस्थ, पाली







