रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे हकालपट्टी; आदिवासी गर्भवतीची प्रसूतीसाठी फरफट
| नेरळ | प्रतिनिधी |
लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सरकारी रुग्णालयांत सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या आदिवासी गर्भवतीला आधी कशेळे ग्रामीण रुग्णालयातून कर्जतला पाठविण्यात आले; मात्र येथेही उपचाराऐवजी खासगी रुग्णालयाचा पर्याय सुचविण्यात आला. त्यात भर म्हणजे पुढील उपचारासाठी जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ आल्याने गरीब कुटुंबाची अक्षरशः फरफट झाली.
कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील धामणी येथील नेत्रा भला या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कशेळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रसूतीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. कर्जत येथे आल्यानंतरही अपेक्षित उपचार न मिळाल्याने पुढे खासगी रुग्णालयात जाण्याचा पर्याय सुचविण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाला खासगी रुग्णालयातील प्रसूतीचा किमान 50 हजार रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली. गंभीर परिस्थितीत रुग्णाला पुढील उपचारासाठी हलविण्याची वेळ आली; मात्र त्यासाठीही रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याने आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या संख्येने ग्रामीण आणि आदिवासी नागरिक वास्तव्यास असताना सरकारी रुग्णालयातच वेळेवर उपचार मिळत नसतील, तर या नागरिकांनी उपचारासाठी जायचे कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सरकारी रुग्णालयात उपचाराऐवजी खासगी रुग्णालयाचा मार्ग दाखविला जात असेल, तर सर्वसामान्यांसाठी उभारलेल्या या आरोग्य व्यवस्थेचा नेमका उपयोग काय? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत; मग प्रसूती सेवा कशी मिळणार?
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सध्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांतील महिलांना पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रामदास तरपेवाड यांना 2023 मध्ये माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
वेळेत उपचार मिळेनात!
दरम्यान, येत्या काही दिवसांत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल, असे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अडकमोल यांनी सांगितले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीनंतर तरी कर्जत-कशेळे परिसरातील गोरगरीब आणि आदिवासी रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.







