दिलीप भोईर समर्थकांकडून हल्ला प्रकरण! चौघांना अटक

मांडवा सागरी पोलिसांची कारवाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

झिराड येथील व्यावसायिकाला रस्त्यात गाठून जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. मांडवा सागरी पोलिसांनी ही कारवाई केली असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत करीत आहेत.

अभिलाष धनंजय पाटील असे या जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. आपल्या दुचाकीवरून बुधवारी सकाळी चोंढी येथे बँकेत पैसे भरणा करण्यासाठी ते जात होते. झिराड येथील स्थानकाजवळ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आल्यावर विक्रम साळुंखे याने अडवून शेठच्याविरोधात का काम करीत आहेस. काम करायचे असेल, तर शेठला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यावेळी अभिलाष व विक्रम यांच्यात शाब्दीक वाद झाले. हा वाद विकोपाला गेला. त्यावेळी आणखी काही मंडळींनी येऊन अभिलाष यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काठीने हल्ला करून त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात विक्रम साळुंखे, अनिकेत शिर्के, मुकेश साळुंखे, संतोष साळुखे, श्रीपाद भोईर, महमंद अली शेख, शोएब मुल्ला या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील चौघांना अटक केली आहे. त्यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले.

Exit mobile version