| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
किरकोळ कारणावरून अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार अलिबागमध्ये घडला. रेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वासमोर ही घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश पराते असे या बांधकाम अधिकाऱ्याचे नाव आहे. अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून ते काम पहात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह काही ठेकेदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ एक महिला व पुरुष दोघेजण वाद घालत होते. वाद घालू नका बाहेर जा, असे पराते यांनी त्यांना सांगितले. याचा राग धरून कांबळे नामक पुरुषाने परातेंची कॉलर पकडून त्यांना ढकलून दिले. त्यानंतर काही मंडळींनी घेऊन पुन्हा रेस्ट हाऊसजवळ आले. त्यावेळीदेखील पराते यांना मंडळींच्या मदतीने मारहाण व शिवीगाळी केली. ही घटना शनिवारी (दि.24) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात दिनेश पराते यांनी तक्रार केली आहे.
बांधकाम अधिकाऱ्याला मारहाण
