। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती महादेव काशिनाथ दिवेकर हे आपापसातील भांडण सोडविण्याकरीता गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून आरोपींच्याविरुध्द अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण पोलीस ठाण्यातून मिळलेल्या माहितीनुसार, या गुन्हयातील आरोपी हे बापदेव मंदिराजवळ अनधिकृतरित्या दुकानाचे बांधकाम करीत होते. या बांधकामासाठी संमत्ती घेतली आहे का? अशी विचारणा केली असता आरोपी भगवान चिंबोरी यांनी इतर सहा आरोपींना बोलावले. हे सहा आरोपी काठ्या व लोखंडी रॉड घेउन घटनास्थळी पोहचले.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महादेव दिवेकर यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात महादेव दिवेकर यांच्या डोक्यात जबर मार बसून हातदेखील फॅक्चर झाला आहे. दिवेकर यांना तातडीने पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पेण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्हयाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लंगारे करत आहेत.