। खालापूर । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यात महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई खालापूर तालुक्यात मंगळवारी (दि.10) करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश ताकाजी देसाई (40) हे महावितरणच्या चौक सेक्शन-2 कार्यालयातील सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यांनी विद्युत रोहित्र बसवण्याच्या कामाचे अंदाज पत्रक तयार करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांचा पाली बुद्रुक येथे व्यावसायिक गाळा असून, त्या ठिकाणी 200 केव्ही क्षमतेचा विद्युत रोहित्र बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. या कामासाठी आवश्यक असलेले इस्टिमेट तयार करून देण्यासाठी योगेश देसाई यांनी 1 लाख 70 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर तडजोड होऊन 1 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने 5 मार्च 2026 रोजी रायगड-अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची 9 मार्च रोजी पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता देसाई यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी खालापूर येथील महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ठरलेली 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश देसाई यांना पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड एसीबीचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
