| आपटा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वावर्ले गावातील एका घरात सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 29 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पितांबर नरसु मोरे (50, रा. वावर्ले, ता. खालापूर) याच्यासह इतर चार जणांविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या राहत्या घरात तीनपत्ती जुगार सुरू ठेवल्याचा आरोप आहे.
ही कारवाई 8 जुलै रोजी खालापूर-कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्तीदरम्यान करण्यात आली. सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वावर्ले येथील घरावर छापा टाकला. छाप्यात आरोपी जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत 29 हजार 20 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, रवी मुंडे, रणजितसिंह खराडे आणि शरद फरांदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.







