भंगारवाल्यांवर होणार कारवाई

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यात सीआरझेड कायद्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जात आहे. बोरी पाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे. कारवाई होत नसल्याने उरण तालुका मराठी पत्रकार संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येलाच प्रशासनाने कारवाईचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले.

उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघाशी तातडीची बैठक घेतली. यावेळी सगळ्या समस्या नीट समजावून घेतल्या आणि या सर्व समस्यांवर ठोस कारवाई करण्याबाबत संबंधित सर्व कार्यालयाशी लवकरच पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही तहसिलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. या बैठकीला उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर व दिलीप कडू, सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष संजय गायकवाड सदस्य प्रवीण पाटील, प्रवीण कोलापटे, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण या सदस्यांसह केगाव विभागाच्या तलाठी, तहसील कार्यालयातील काही अधिकारी आदी उपस्थित होते.

उरण तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. तालुक्यात केगाव दांडा परिसरासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. विशेषत: केगाव दांडा परिसरात तर कांदळवनांवर मोठ्या प्रमाणात समुद्र भरती रेषेला लागून भराव करण्यात आला आहे. गुरचरणाच्या जागेवर एक भली मोठी सुमारे शंभर खोल्यांची इमारत बांधली जात आहे, मात्र त्यावर कारवाई केली जात नाही. यावर कारवाई व्हावी अशी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी आहे. तसे पत्रदेखील उरणच्या तहसीलदारांना यापूर्वीच दिले आहे. मात्र त्यावरही कारवाई झाली नाही. कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. मांडलेल्या सर्व प्रश्‍नांवर ठोस उपाय योजना करण्याचे आश्‍वासन तहसीलदार उद्दव कदम यांनी दिले असून त्यांनीच पत्रकारांचे आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी केली.

Exit mobile version