| पोलादपूर | प्रतिनिधी |
सोमवारी दुपारी आंबेनळी घाटामध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी निघालेला मिनी टेम्पो दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दरीमध्ये कोसळला. या भीषण अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.
पुणे येथील टाटा मोटर्सचे तीन योद्धा टेम्पो हे घाटातील टेस्ट ड्राईव्हसाठी पुणे ते पोलादपूर प्रवासाला निघाले होते. कात्रज खंडाळा येथील खंबाटकी तर वाई येथील पसरणी घाटात टेस्ट ड्राईव्ह पार करून हे तीन टेम्पो महाबळेश्वरमार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला जात होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीनपैकी एका टेम्पोचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो सुरक्षा कठडा तोडून तीनशे फूट खोल दरीत कोसळला. यावेळी अन्य दोन टेम्पोमधील लोकांनी अपघाताची खबर मेटतळे गावातील लोकांना दिली असता काही तरुणांनी अपघातस्थळी धाव घेत दरीमध्ये उतरून मदतकार्य केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि प्रतापगड ट्रेकर्सच्या जवानांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन बचावकार्यात सहभाग घेतला. याप्रसंगी महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सहभाग घेतला.
जखमींमध्ये टेम्पो चालक देवदत्त वाघ व इंजिनियर जितेंद्र खाणे हे गंभीर जखमी असून, त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरीत उतरून बचावकार्य करणारे दोन स्थानिक युवक सीताराम शिंगरे व सोमनाथ वागदरे हेदेखील जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील एकही रुग्णवाहिका घटनास्थळी न आल्याने आणि वैद्यकीय पथकही न आल्याने तहसिलदार पाटील आणि उपविभागीय अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.







