पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर
| माथेरान | मुकुंद रांजणे |
रायगड जिल्ह्यातील एक नयनरम्य पर्यटनस्थळ आणि विशेष म्हणजे शांत वातावरण, शुद्ध हवा, प्रेमळ स्थानिक लोक तसेच पॉईंट्सवरील देखावे पाहण्यासाठी भटकंती करणाऱ्या पर्यटकांना लाल मातीच्या रस्त्यावरून पायी चालत जाण्याची हौस आजही यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यामुळेच खासकरून असंख्य पर्यटक हे पॉईंट्सकडील लाल मातीच्या रस्त्यावरची सैर चालत चालत करण्यात धन्यता मानतात.
जंगलातून मार्गक्रमण करताना एक वेगळाच आनंद, अनुभव त्यांना येत असतो. पावसाळ्यात पक्षांचा किलबिलाट, शुभ्र निर्झरांचा खळखळाट मनाला ताजेतवाने करतो. त्यासाठी वर्षाऋतुमध्ये सुध्दा पायी चालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. दरवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळेच नगरपरिषदेच्या माध्यमातून जागोजागी मातीचे बंधारे टाकून पावसाळी पाणी गटारात जाण्यासाठी सोय केली जाते. काही ठिकाणी गटारांची साफसफाई झालेली नाही. ज्या-ज्या ठिकाणी बंधारे टाकण्यात आले आहेत ते बंधारे कमकुवत असल्याने अतिवृष्टीमुळे पाणी रस्त्यावरून वाहते त्यामुळे रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झालेली पहावयास मिळते.दगडधोंड्यांच्या या रस्त्यात चालणे जिकरीचे बनले असून अपघाताच्या घटनादेखील घडत असतात.
पावसाळ्यात माथेरान याच ठिकाणी पायी चालत फिरण्याचा खूपच मनसोक्त आनंद मिळतो. सनसेट पॉईंटवरून येताना मॅलेट स्प्रिंग पॉईंटच्या चढणीवर आमच्या कुटुंबातील एका सदस्यांचा या दगडगोट्याच्या रस्त्यावर चालताना पाय मुरगळला. कसेबसे आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो. इथले नैसर्गिक सौंदर्य खूपच सुंदर आहे फक्त इथले रस्ते सुस्थितीत असावेत.
– आदिनाथ कापसे, पर्यटक मुंबई
स्थानिक प्रशासनाने पेवर ब्लॉकचे रस्ते वगळून आवश्यक ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रेक्षनीय स्थळाकडे जाणाऱ्या मार्गांवरील डबर बाजूला करून पडलेल्या खड्ड्यामध्ये माती भरून खड्डे भरले तर बंगल्याकडे जाणाऱ्या माळी कामगारांना व निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना या रस्त्यावरून चालण्यास सोयीचे होईल. कारण पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यांची बिकट अवस्था असल्याने बहुतेक पर्यटक अर्ध्यातून माघारी फिरतात व त्यांचा हिरमोडही होतो. याचा स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.
– चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष माथेरान
