| माथेरान | वार्ताहर |
दरवर्षी पावसाळ्यात इथल्या मातीच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर धूप होत असते. त्यासाठी पर्याय म्हणून सनियंत्रण समितीने याठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांना मान्यता दिलेली आहे. परंतु, काही ठिकाणी जुन्याच पद्धतीचे रस्ते असावेत, ज्यामुळे माथेरानच्या लाल मातीची ओळख संपुष्टात येणार नाही, त्यासाठी काही भागात असेच लाल मातीचे रस्ते ठेवण्यात येत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाळी पाणी वाहून जाते, त्यामुळेच रस्त्यांची नेहमीच वाताहत होते. रस्त्यांवरील दगड मातीवर आल्याने हातरिक्षा तसेच ज्या ज्या मुख्य पॉईंट्सकडे घोड्यांची वर्दळ असते, पर्यटकसुद्धा पायी चालत निसर्गाचा आनंद घेतात त्याना चालताना खूपच त्रासदायक बनते. याकामी नगरपरिषदेच्या उत्तम प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे (शिंदे) यांनी माथेरानमधील संपूर्ण भौगोलिक परिस्थिती जाणून घेत आगामी नाताळ सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेऊन, ज्या ठिकाणी रस्त्यांची मोठया प्रमाणावर वाताहत झाली आहे. त्याठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीसाठी आपल्या कर्मचार्यांना सूचना देत युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत.
जिथे जिथे रस्त्याला खड्डे पडले आहेत, त्याठिकाणी दगड मातीच्या भरावाने रस्ते पूर्ववत केले जात आहेत. याकामी बांधकाम अभियंता स्वागत बिरंबोले, अर्जुन पारधी यांच्या देखरेखीखाली चांगल्या दर्जाचे रस्त्यांची कामे पूर्ण केली जात आहेत. प्रशासक सुरेखा भणगे यांच्या कार्यपद्धतीमुळे श्रमिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
माथेरानच्या प्रशासक सुरेखा भणगे यांनी या गावातील मातीचे रोड चांगल्या प्रकारे बनवण्याचा मनात निर्धार केला आहे. त्यामुळे चांगले रोड मिळतील याची आम्हाला अपेक्षा आहे. रस्त्यावर आपले पोट भरणारे घोडेवाले असो, रिक्षावाले पर्यटक असो, यांना या चांगल्या रोडचा आनंद घेता येईल.
राकेश कोकळे
अश्वपालक, माथेरान