| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील सावरसई येथील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली. शुक्रवारी (दि.20) मार्च रोजी साजऱ्या झालेल्या या उत्सवात हजारो भक्तांनी अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने सहभाग घेतला. यावेळी अभिषेक, आरती, पालखी सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मठ परिसरात दिवसभर भक्तिगीत, नामस्मरण आणि जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पेण तालुक्यातील सावरसई येथील स्वामी समर्थ मठही श्रद्धेचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले असून दरवर्षी येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याप्रसंगी मठाच्या ट्रस्टतर्फे तीर्थप्रसाद व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गावातील ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.







